🕒 1 min read
सिंधुदुर्ग:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. भाजपचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी उतरवला. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
भाजपने गेल्या वर्षभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत प्रकरण असेल किंवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून आपल्या विचारांचे जे लोक नाहीत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. कोरोना बाधितांचे आकडे जरी कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना चाचण्या कमी झाल्या, असा आरोप करायचे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक बघून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम कधी पूर्ण होणार? धनंजय मुंडे म्हणाले…
- 1 जानेवारी पासून UPI पेमेंटवर शुल्क आकारणी
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस


