नांदेड : लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळी दौरे करत आहेत.
दरम्यान, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आता सरकारमधील मंत्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोहोचत आहेत. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मात्र, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
मुखेड तालुक्यातील सलगरातील शेतकऱ्यांनी वडेट्टीवारांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. पाहणी दौरे थांबवा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शासनाप्रती बळीराजाच्या मनात असणारा रोष किती तीव्र आहे याचा प्रत्यय आल्याची चर्चा आहे.
यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे, असा विश्वास देत वेळप्रसंगी कर्ज काढायला लागले तरी काढू पण आम्ही शेतकऱ्यांना मदत करु, असा शब्द मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता मंत्री हा शब्द किती पाळतात याकडं शेतकरी बांधवांच लक्ष लागलं असून ते शब्द पूर्ण करणार कि नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांना उपेक्षाच मिळणार असा उद्विग्न सवाल केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यपालांचं वर्तन पदाला शोभण्यासारखं नाही ; राजू शेट्टींनी केली टीका
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे


