अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्याने बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे कंगना टीकेची धनी ठरली आहे. आता यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कंगनावर टीका केली आहे. कंगना राणावत कोण आहे हे मी ओळखत नाही. मी काही जास्त त्यांचे ट्विट बघत नाही. मला त्यापेक्षा जास्त महत्त्वाची कामे असतात. माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्याचे विषय आहेत. त्यामुळे कंगना राणावत हिने काही ट्विट केले तर ते फार गांभीर्याने घेण्यासारखं मला वाटत नाही, असे राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.
मुंबई पोलिस व महाराष्ट्र पोलिस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून त्यांचा मला अभिमान आहे. त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल कोणी काही बोलण्याची गरजच नाही, असा टोलाही तनपुरे यांनी कंगनाला लगावला आहे. आज अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे राज्यमंत्री तनपुरे हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबई पोलिसांवरती कोणी आरोप करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कंगना राणावत सारख्या अभिनेत्रीला आम्ही महत्त्व देत नाही. आम्ही मुंबई पोलिसांच्या मागे ताकदीनिशी उभे आहोत असेही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.
पत्रकारांना द्या ५० लाखाचे विमा कवच, ‘या’ जिल्ह्यात होतेय मागणी


