मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव केला आहे. सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती असा दावा पवारांनी केला आहे.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, इथे कठोरपणे लॉकडाऊन राबवला आणि विशेष म्हणजे लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारायला मदत झाली. नाहीतर अनर्थ झाला असता. पहिले दोन महिने-अडीच महिने याची आवश्यकता होती. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारचा दृष्टिकोन शंभर टक्के बरोबर होता. आमचा सगळ्यांचा याला मनापासूनचा पाठिंबा होता, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीबाबत देखील पवारांनी यावेळी आपलं मत मांडल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे.
दरम्यान, याच मुलाखतीमध्ये पवारांनी राजकीय टोलेबाजी देखील केली. शिवसेना नसती तर भाजपचे ४०-५० आमदारच असते. मी पुन्हा येईन हा तर चेष्टेचा विषय झाला असल्याचा टोला शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही, असेही शरद पवार यांनी म्हंटले आहेत.
‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’
‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’

