नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे २ लाख ३४ हजार ६९२ नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. १ लाख २३ हजार ३५४ जणांना डिस्चार्ज मिळाला, तर १३४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठा ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ११ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना स्थिती, लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन याबाबत आढावा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या बैठकीत अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करतील. यापूर्वी पंतप्रधानांनी आरोग्य, स्टील, परिवहन मंत्रालयासह विविध विभागांशी संवाद साधून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा घेतला होता.
दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याचा भारतातील वेग हा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. यातच हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे इथे होणाऱ्या गर्दीने कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाणही मोठे आहे. अनेक साधू-संत कोरोना बाधित झाले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे डेहराडून येथे निधन झाले. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना संकटाचा विचार करता कुंभ मेळा केवळ प्रतिकात्मक ठेवावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरची टिव टिव थांबली, तांत्रिक अडचणीमुळे सेवा काही काळासाठी ठप्प
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
- रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री, मेडिकल चालकाविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा


