पणजी : गोव्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट गोव्यात आहे. गुरुवारी रुग्णवाढीचा दर ४८.१ टक्के होता. गेल्या २४ तासांत गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे व ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गोव्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला. ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने गोव्यातील या रुग्णालयात गेल्या चार दिवसांत ७४ लोकांनी आपला जीव गमावला असून प्रशासन मात्र रुग्ण मोजणीसंदर्भातील गोंधळ असल्याचा दावा करत आरोप-प्रत्यारोप करत आहे.
या प्रकरणी गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरून सुरू असलेल्या या गोंधळप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘भाजप सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचे उरलेले नाही. असे अपयशी सरकार राज्यपालांनी ताबडतोब बरखास्त करावे,’ असा ठराव गोवा काँग्रेसच्या बैठकीत पणजी येथे केला. आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि इतर संघटनांचे प्रमुख यांनी भाग घेतला. या बैठकीत सर्वसंमतीने अनेक ठराव मांडण्यात आले. त्यात राज्य सरकार बरखास्त करणे, पूर्णवेळ राज्यपाल नेमणे, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोविड काळात चालविलेले काम पुढे नेणे, कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यूबद्दल भाजप सरकारचा निषेध, इव्हरमेक्टींग औषध वापराबद्दल सरकारचा निषेध व त्याचा पुरवठा थांबविणे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त 21 मे रोजी गट पातळीवर एक लाख मास्क वितरीत करणे, मोफत कोविड चाचणी केंद्र वाढविणे व लसीकरणाला गती देणे, करोनाची दुसरी व तिसरी लाट थोपविण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याचा सल्ला, कोविड योद्ध्यांचा सन्मान करणे, आदी ठराव संमत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ लस प्रभावी : भारत बायोटेक
- …म्हणून पुण्यात उद्या लसीकरण नाही ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती !
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’


