मुंबई – डॉक्टर नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, काँरंटाईन करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, गरिबांपर्यंत धान्य पोहोचू शकत नाही, जे अन्नधान्य शिजवलेले पोहोचते ते खराब असते किंवा अर्धे शिजलेली असते, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, त्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत, त्यातील सर्वाधिक मृत्यू मुंबईत, सर्वाधिक मृत्यू चा दर मुंबईचा, यानंतर कधी नियंत्रण मिळेल याची खात्री नाही. पालकमंत्री गायब, सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेतले नाही, नगरसेवकांशी समन्वय नाही, असे चित्र आहे देशाच्या आर्थिक राजधानीचे आणि 80 हजार कोटींच्या ठेवी आणि 33 हजार 441 कोटींचा बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे.. कोरोनाच्या लढाईत 26 जुलैच्या पुराप्रमाणे हताश, हतबल चित्र जगासमोर आले आहे, अशी खरमरीत टीका भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका करत असलेल्या कोरोनाच्या कामातील अनेक त्रुटी आणि मुंबईकरांचे होत असलेले हाल, यावर प्रकाशझोत टाकला. आज या परिस्थितीत मुंबई महापालिका ज्या पद्धतीने काम करते आहे ते पाहिल्यावर पुन्हा एकदा 26 जुलैच्या पुरात मुंबईची जे हाल झाले होते आणि महापालिकेची जी परिस्थिती होती, तसेच चित्र आज पहायला मिळते आहे असे, आमदार अँड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. श्रीमंत मुंबई महापालिकेचा कारभार 26 जुलैच्या पुरानंतर उघडा पडला होता. तशाच मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील अनेक गोष्टी आज उघड्या पडल्या आहेत, अशी टीका आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. मुंबई एकूण 5678 रुग्ण दाखल असून त्यापैकी 2 हजार 78 जणांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 116 आहे. मुंबई उपनगराच्या पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील वरळी हा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट तर प्रभादेवी, धारावी, लोअर परेल, भायखळा, नागपाडा, मलबार हिल, ग्रँडरोड, गोवंडी मानखुर्द असे हाँटस्पाट वाढत आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रातील पहिला रुग्ण जे परदेशातून आले आणि मुंबईतून पुण्यात उपचारासाठी दाखल झाले ती तारीख होती 9 मार्च 2020. तर मुंबई महापालिका कंत्राटी पध्दतीने डाँक्टर घेण्यासाठी 15 एप्रिल 2020 ला जाहीरात प्रसिद्ध करते. तर रुग्णवाहिका आणि चालक पाहिजे म्हणून आज म्हणजे 17 एप्रिलला जाहिरात काढते. महिनाभरानंतर या गोष्टींच्या जाहीराती काढण्यात आल्या आहेत. महापालिकेकडे, रुग्णवाहिका, डाँक्टर यांचा तुटवडा आहे, याचा अंदाज पालिकेत बसलेल्या आठ आयएएस अधिकाऱ्यांना एवढ्या उशिरा का आला. ज्या जाहिराती काढल्या त्यामध्ये सुध्दा जाचक अटी घालण्यात आल्या आहेत त्यामुळे अजून 15 दिवस तज्ञ डाँक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत.
कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी मुंबई महापालिकेत वस्तीश: COVID RAPID TESTING KIT द्वारे तपासणी करण्याचा निर्णय 1 एप्रिलला झाला. आज 16 एप्रिल अद्याप किट आले नाहीत. केवळ 5,000 किट येणार ते दिड कोटीच्या मुंबईत – फक्त धारावी/वरळीत तरी पुरतील काय? तसेच सुरक्षा किट नाहीत म्हणून पालिकेच्या शताब्दी, कुपर, भाभा रुग्णालयात डाँक्टरांना आंदोलने करावी लागत आहेत, असे चित्र पहायला मिळते आहे. तर मास्क स्कँनिग करण्यात येत नसल्याने त्याच्या जीवाला धोका आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टर, नर्सेस यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. या परिस्थितीत डॉक्टर-नर्सेसना सुरक्षित साधने आणि इतर सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयात नर्सेसची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप जन स्वास्थ अभियान या संघटनेने केला असून तसे पत्रच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पाठविले ही बाब पण आमदार आशिष शेलार यांनी निदर्शनास आणून दिली.
नगरसेवकांना 25 लाख रूपये निधी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला पण पंधरा दिवस उलटून गेले तरी निधी देण्यात आलेला नाही. स्थायी समितीच्या दोन बैठका टाळेबंदी नंतर घेण्यात आल्या जर कोरोनाबाबतचे निर्णय करुन ही त्याचा उपयोग होणार नाही तर मग स्टँडिंग मधे कसले अंडरस्टँडिंग झाले? असा प्रश्नही आता मुंबईकरांच्या मनात येतो आहे.
दोन्ही पालकमंत्र्यांनी मुंबईचा आमदारांशी संपर्क नाही. सूचना ऐकत नाहीत. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नगरसेवकांच्या सूचना लक्षात घेण्यात येत नाहीत, त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजेत असे महापौर आणि महापालिका प्रशासनाला का वाटत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात बजेटही मोठ आहे पण गेल्या महिनाभराच्या काळात आरोग्य समितीची एकही बैठक झालेली नाही प्रत्यक्ष भेटून बैठक घेणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणे आवश्यक आहे. एकही गटनेत्यांची बैठक झालेली नाही. तसेच आजही रेशनिंगचे धान्य उपलब्ध होत नाही त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नऊ आयएएस अधिकारी महापालिकेत असूनही एकूण कामाचा बोजवारा उडाला आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षाही आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या यंत्रणेला अजूनही रोगावर ताबा मिळवता आलेला नाही.. अजूनही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. खाजगी डाँक्टर, खाजगी रुग्णालये अजून ही पालिकेला दाद देत नाहीत. धान्य अजूनही गरजूपर्यंत पोहचत नाही. शिजलेले अन्न पोहचवणारी यंत्रणा हाताळताना विलंब होत असल्याने मुलुंड भांडूप यासारख्या परिसरात अन्न पोहचेपर्यंत खराब झाले. यंत्रणा नसल्याने शिजलेले अन्न अनेक भागात दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत पोहोचते. शिव भोजन थाळी कुठे आहे? असा सवालही मुलुंड भांडुप मधील नागरिक आणि नगरसेवक विचारत आहेत.
पालिका रुग्णालयात केईएम सारख्या किंवा सायन सारख्या रुग्णालयात सँनिटायझेशन यंत्रणेची व्यवस्था नाही, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिकेची संख्या अपुरी असून रुग्णवाहिकेचे दर पालिकेने निश्चित केलेले नाहीत त्यामुळे अनेक वेळा एकतर रुग्णवाहिका मिळत नाही किंवा अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
मुंबई महापालिकेने गरजूंचे अन्नपाण्याविना हाल होवू नये यासाठी सुरु केलेल्या १८०० २२२ २९२ या हेल्पलाईनवर जेवणाच्या पाकिटांऐवजी सर्वाधिक मागणी धान्याची होत आहे. काल पर्यंत ३ हजार ७१० लोकांनी धान्यांची मागणी केली. तरी त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. धान्य पोहचत नाही म्हणून वांद्रे येथे हजारोंचा जमाव रस्त्यावर आला त्यानंतर या भागात धान्य पोहचायला सुरुवात झाली, असेच चित्र मुंबईच्या अनेक भागात आहे.
मुंबईत रुग्ण वाढत आहेत तसे मुत्यू चा दर ही जास्त आहे, हे लक्षात येण्यासाठी महापालिकेला पंधरा ते वीस दिवसाचा विलंब झाला त्यामुळे विलंबाने कमिटी गठित करण्यात आली, विलंबाने टास्क फोर्स निर्माण करण्यात आला आहे. या संपूर्ण कामात मुंबई महापालिका विलंब जे करते आहे त्याचा एकूण परिणाम मुंबईला पुन्हा रुळावर येण्यासाठी होणार आहे. मुंबई पुन्हा रुळावर येण्यासाठी जेवढा विलंब होईल तेवढे मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचे आर्थिक नुकसान होणार आहे, याचे भान मुंबई महापालिकेला आहे काय? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी विचारला आहे.
दरम्यान, राज्यात अनेक भागात अवकाळी पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा निसर्गाने ही झोडपण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहेत तसे आदेश शासनाने द्यावे.
मजूरांपर्यंत आज ही सरकार अन्नधान्य पोहचवण्यात अपयशी ठरत आहे. मजूरांचे तांडे ठिकठिकाणी उपाशी असल्याच्या बातम्या रोजच्या रोज येत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस झाल्याने ऊसतोड मजूरांच्या झोपड्या उध्वस्त झाल्या. त्यांचे प्रश्न सातत्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे मांडत आहेत. रोजगार बुडतो म्हणून बीड मधील 13 हजार 681 तर औरंगाबादमधे 30 हजार ऊसतोड कामगार भगिनींनी गर्भाशय काढून टाकण्याचा धक्कादायक व दुर्दैवी प्रकार ज्या महाराष्ट्रात घडतो, आम्ही विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांवर सरकार हे मान्य ही केले होते. त्या ऊसतोड कामगारांकडे सरकार एवढे दुर्लक्ष कसे करु शकते? अवकाळी पावसाने या कामगारांना उघड्यावर आणलेय.. त्यांचे संसार उद्ध्वस्त केलेत.. त्याबाबत तातडीने उपाययोजना करा… सरकारने आंधळ्याचे आणि बहिऱ्यांचे सोंग घेऊ नये, असे ही आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

