टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘एमएमटीसी’कडून पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले होते, यानंतर आता सरकार नरमले असून पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याच्या निविदेत बदल करण्यात आला आहे.
६ सप्टेंबर रोजी एमएमटीसीकडून काढण्यात आलेल्या निविदेत नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा हवा असल्याचे म्हंटले आहे. इजिप्त, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून कांदा आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र पाकिस्तानमधून कांदा आयातीचा निर्णय बदलत इतर कोणत्याही देशातून कांदा आयात करता येईल, असे सुधारित निविदेत म्हंटले आहे.
कांदा आयातीच्या निर्णयावर टीका करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले होते. खरीपाचा कांदा काढणी महिन्याभरावर आली आहे. अशावेळी पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याची काय घाई आहे? भारतीय शेतकरी हे आपले शत्रू आहेत का ? असा सवाल शेट्टी यांनी केला होता.
दरम्यान, पाकिस्तानमधून कांदा आयातीचा निर्णय बदलण्यात आला असला तरी इतर देशातून तो मागवण्यात येणार आहे. निविदेत नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा हवा असल्याचे म्हंटले आहे. या दरम्यानचं राज्यातील खरीपाचा कांदा बाजारात येतो, त्यामुळे आयात कांदा बाजारपेठेत आल्यास दर कोसळू शकतात.


