अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे.
दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष देखील करु असं म्हटलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानच्या बचावासाठी ठाकरे सरकार जीवाचं रान करतंय, पण 28 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा यांच्या माणुसकीला जराही पाझर फुटत नाही. ज्या लालपरीने उभ्या महाराष्ट्राला त्याच्या सुख-दुखाच्या प्रवासात निरंतर अहोरात्र साथ दिली. आज तिच्याच चालकांवरती आपला आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ येत असेल तर हे खूप लाजिरवाणा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली.
पडळकर यांनी म्हटलं आहे की, एस टी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नका. आपण संघर्ष करू अशी विनंती पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना केलीय. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी संघटनेत फूट पाडून अफवा पसरवतं आणि पोलिसांच्या बळाचा गैरवापर करून संप चिरडण्याचा प्रयत्न करतंय. जे ‘राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना’लवकरात लवकर द्यावं. कुठल्याही पोलीस बळाचा वापर करू नये. अन्यथा आणखी एखाद्याने जीव गमावला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असेही, पडळकर म्हणालेत.
गेल्या 6 महिन्यात 27 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडं राजकारण करणं बंद करा व त्वरीत एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’

