टीम महाराष्ट्र देशा : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या आठवड्यात कोणालाही एलिमिनेट केलं नव्हतं. मात्र दुसऱ्या आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर जाणार हे निश्चित होतं. पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, वीणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे यांच्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अखेर या स्पर्धेतून मैथिली जावकरला कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर जावं लागलं.
मैथिलीच्या चाहत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. आपल्या बिग बॉसच्या घरातील दोन आठवड्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना मैथिली म्हणाली की, ‘या घरात कोणंच कोणाचं ऐकत नाही. इथे सारेच उद्धट, उर्मट आहेत. मी खूप एन्जॉय केलं. घरातला अनुभव कधीही न विसरता येईल असाच होता. नेहा सोडून सगळ्यांशीच माझी चांगली मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवनने मला थोरली बहीण मानली. मला या घरात दोन भाऊ मिळाले.’


