चंद्रपूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावे अशी विनंती चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणीही या पत्राच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
साहीत्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे मराठी साहीत्यीक आहेत. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, पोवाडा, लोकनाट्य, प्रवास वर्णन असे सर्व प्रकार त्यांनी मोठ्या ताकतीने पेलले. आपल्या उच्च कोटीच्या प्रतिमेचा उपयोग त्यांनी अजन्म दिनदुबळे, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, कामगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी केला. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कीर्ती पोवाड्याच्या माध्यमातुन सातासमुद्रापार पोहोचविली तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्यांच्या मनात त्यांनी शिवप्रेरणेची ज्योत पेटवली आणि लढा यशस्वी होईपर्यंत ती पेठवत ठेवली.
तुम्ही कोरोनावर फोकस करा, बुलेट ट्रेन नागपुरलाही नेऊ ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला
साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून सुमारे ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह एक प्रवासवर्णन, नाटक आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा अण्णाभाऊंनी निर्माण केली. जगभरातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतर करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांच्या समाज कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना या थोर समाज सुधारकाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी देशभरातून मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. स्वातंत्रपुर्व काळात आणि स्वातंत्र्यनंतर त्यांनी लेखणीच्या माध्यमातुन समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे मोठे कार्य केले. त्यामुळे उच्च प्रतिमेचे धनी असलेले डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्यास तो संपुर्ण महाराष्ट्राचा गौरव ठरेल. असे या पत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठराव करून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणीही या विनंती पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मोठी बातमी : १ ऑगस्टपासून सुरु होऊ शकते जिम अन् सिनेमागृह


