टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील नेत्यांची आपली स्वतंत्र अशी एक कामाची शैली आहे.शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांची दोन दिवसांपुर्वी पावसात सभा झाली. देशमुखांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला पण मात्र आबा बोलतच राहिले. मग संयोजकांनी जवळच्या घरातून छत्री आणली आणि आबांच्या डोक्यावर धरली. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या या नेत्याचा लढाऊ बाणा यावेळी लोकांना दिसला.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे ५० वर्षाहून अधिक काळ गणपतराव देशमुखांनी प्रतिनिधीत्व केले. २०१९ च्या निवडणुकीवेळी वयोमानामुळे न लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तिथे शेकापने सुरवातीला एक उमेदवारी जाहीर केली, मात्र ती नंतर बदलण्यात आली. शेवटी लोकांच्या आग्रहास्तव गणपतरावआबांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना रिंगणात उतरवण्यात आले. अटीतटीच्या लढतीत डॉ. देशमुख हे फक्त ५०० मतांनी पराभूत झाले. निवडणुकीनंतर ते उर्वरित शिक्षण पुर्ण करत आहेत.
मात्र पराभवानंतरही गणपतराव खचलेले नाहीत. ते सातत्याने लोकांना भेटत आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहेत.शेतकरी कामगार पक्षाची युवा संघटना असलेल्या पुरोगामी युवक संघटनेच्या शाखा उघडण्याचा कार्यक्रम त्यांनी सांगोला तालुक्यात सुरू केला आहे. त्याच कार्यक्रमासाठी ते महुद येथे गेले होते. त्यांचे भाषण सुरू झाले आणि पाऊस आला पण त्यांनी भाषण थांबवले नाही. मग कार्यकर्त्यांने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. या वयातही त्यांच्यातील सहनशक्ती लोकांना बघायला मिळाली.गणपतरावांची ही घटना शरद पवारांच्या सभेची आठवण देणारी ठरली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

