🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:-लाडक्या बाप्पाच्या विसर्जणासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मुंबई – पुण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारा बाप्पा आज त्याच्या गावी जाणार आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर तो परतीच्या प्रवासाला निघेल. बाप्पा जाणार यामुळे मनात भावना दाटून आलेल्या असल्या तरी विसर्जन मिरवणुकीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू आहे.
तर मुंबईकरांचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या लालबाग राजाची मिरवणूक आता सुरू झाली आहे.मुंबईतील प्रथम रहिवाशी मानल्या जाणाऱ्या कोळी बांधवांनी लालाबाग राजाचा जयघोष यावेळी करत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळी महिलांनी पारंपरिक नृत्यू सादर करत विसर्जन मिरवणुकीचा उत्साह वाढवलेला पाहायला मिळतोय. ही शान कोणाची! लालबागच्या राजाची या जयघोषात लालबाग परिसर दुमदुमला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बसरणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होत असल्याने प्रशासनाने देखील त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील अनेक चौपट्या, तलावात विसर्जन केले जाते. त्यामुळे प्रशासनाने या सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली आहे. तसंच चौपट्यांवर मोठ्या प्रमाणात जीवरक्षक आणि मोटार बोट या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

