🕒 1 min read
अमरावती : अमरावती शहरात आज पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आता कोरोना बाधितांची संख्या सहा झाली आहे. या सहाही लोकांना कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली, या साखळीचा शोध न लागणे ही तमाम अमरावती जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून या सहा जणांना कोरोनाची लागण करणारे कोरोनाबाधित इसम अजूनही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिपथात न येणे सगळ्यात धोकादायक आहे. अमरावतीची संभाव्य दुरवस्था थांबण्यासाठी तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
गठ्ठा मतपेटीचे राजकारण करणाऱ्या कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता अमरावती शहरात कोरोना बाधितांची साखळी कुठून सुरू झाली, याचा कसून तपास करणे, यालाच जिल्हा प्रशासनाचा प्राधान्यक्रम असावयाची गरज शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत अमरावती शहराची कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमी वाटत असली तरी वास्तव भयावह व स्फोटक आहे. कारण, या पूर्वीचे एकाच कुटुंबातील पाच जण आणि आज आढळलेला एक इसम कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाला, याचा शोध घेण्यात अद्यापि यंत्रणेला यश आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर अमरावती व इतर शहरांची परिस्थिती भिन्न असल्याचे स्पष्टपणे जाणवते. बहुतांश शहरांमध्ये विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांच्या किंवा निजामुद्दिन येथील तबलिगी जमातीच्या मरकज मध्ये गेलेल्या लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोना पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. बाधितांच्या साखळीचा शोध लागला तर ही साखळी तोडणे व प्रसार रोखणे शक्य होते. मात्र, अमरावतीची परिस्थिती भिन्न आहे. आजपर्यंत आढळलेले सहाही लोक मरकजला गेले नव्हते. त्यांनी विदेशात प्रवासही केला नव्हता. किंवा ते अशा संशयितांच्या संपर्कात आले असल्याची माहिती देखील समोर आलेली नाही. मग हे सहा जण कसे व कोणामुळे पॉझिटिव्ह झाले, हा यक्षप्रश्न कायम आहे. असेही कुलकर्णी म्हणाले.
या घटनाक्रमाकडे नजर टाकल्यास या सहा लोकांना कोरोनाची लागण करणाऱ्या साखळीतील जिवंत कोरोना कड्या समाजात राजरोसपणे फिरत आहेत. एका अर्थाने ते कोरोना बॉम्ब आहेत आणि ते दृष्टिपथात नसल्याने कुठे कुठे आणि किती लोकांवर स्फोट घडवून आणतील, या भयावह शक्यतेने लोक हादरले आहेत. आज उघडकीस आलेल्या तरुणाला घरातच कोरोन्टाईन होण्यास सांगितले असताना तो राजरोस हिंडत होता. हे सहा लोक किती लोकांच्या संपर्कात आले, हे शोधून काढणे देखील क्रमप्राप्त आहे. सहाव्या बाधित युवकाच्या वडिलांचा मृत्यू आठवड्यापूर्वी झाला. तो ऑटोरिक्षाचालक होता. त्यांचा थ्रोट स्वॅब घेतला नसल्याने ते ही कोरोनाग्रस्त होते की नाही, पॉझिटिव्ह असतील तर किती लोकांच्या संपर्कात आले, यावरून अनेक शंकांना वाव आहे.
अमरावतीची अवस्था ढासळू द्यायची नसेल तर तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करून कडक व सख्तीचे लॉकडाऊन, घराघराची तपासणी, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गर्दी होऊ न देणे अशा उपाययोजनांची गरज आहे. या सहा लोकांना कोरोना लावणारे अदृश्य बॉम्ब कोणते, हा तपास न लागल्यास अमरावतीत केव्हाही स्फोट होऊ शकतो. गठ्ठा मतांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव आणण्यापेक्षा स्वतःचा नाहक हस्तक्षेप थांबवून आपल्या प्रभावक्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी जनतेत उतरून पुढाकार घेतला पाहिजे आणि जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाई करण्यास बाध्य केले पाहिजे. ही वेळ राजकीय लांगुलचालनाची नसून लॉक डाऊनला आणि सोशल डिस्टनसिंगला सहकार्य करणाऱ्या ऐंशी टक्के लोकांच्या जीवाशी खेळू नये, असेही स्पष्ट शब्दात शिवराय कुळकर्णी यांनी नोंदवले आहे.
Sixth COVID patient detected in Amravati. But it is unfortunate to see local administration is yet to detect their travel and contact history which is even concerning. Thus there is doubt about such COVID bomb might be moving across the city.
तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करा ! pic.twitter.com/T367YLlXni— Shivaray Kulkarni ( मोदी का परिवार ) (@ShivarayK) April 18, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

