मुंबई: राज्यातील कोरोनाबधित रुग्ण बरे होत आहे ही समाधानकारक बाब आहे. कोरोना बधितांची संख्या वाढू नये यासाठी आम्ही जमावबंदी आणि आचारसंहिता लागू केली आहे, मात्र तरीही काही लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. मात्र हे लक्षात असू द्या की, कोरोना सारखा भयावह आजार लहान मोठे, वृद्ध पाहून होत नाही, त्यामुळे स्वःताची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह वरून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, उद्या गुढीपाडवा आहे, नववर्षाचा पहिला सण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या पहिल्या दिवशी आपणा सर्वांना दृढ संकल्प कारायचा आहे. ‘मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार मी कोरोनाला हरवणार,’ असा संकल्प सर्वांनी करूया. तसेच राज्यसरकार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवणार आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याची गरज नाही. जमावबंदी ही तुमच्या सुरक्षिततेसाठी लागू केली आहे. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राजेश टोपे पुढे म्हणाले, राज्यात 1000 हॉस्पिटल कोरोना बधितांच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहेत. तसेच सीएसआर च्या माध्यमातूनही अनेक मदतीचे जे हात पुढे येत आहे त्यांचेही आभार, असे म्हणत त्यांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे, पुणे मुंबईहून गावी गेलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा, ते पुणे मुंबईहून आलेत म्हणजे ते कोरोनाबाधित नाहीत. मात्र जर कोणाला तशी लक्षणे आढळली तर तीन रुग्णालयात भरती करा, त्यांच्याशी माणुसकीने वागा, बाधित लोकांनाही माणुसकीची वर्तणूक द्या,अशी विनंतीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केली.


