पुणे : येत्या रविवारी एमपीएसएसीकडून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांकडून होतं आहे. या परीक्षेसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती ही परीक्षा केंद्र आहेत. पुण्यातीलच परीक्षा केंद्रांवर 40 हजार उमेदवार परीक्षा देतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
परीक्षा देण्यासाठी परिक्षार्थी त्यांच्या पालकांसह पुण्यात येतील. त्यामुळे गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशी शंका व्यक्त होत आहे. तसंच परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येईल, यामुळे अजून धोका वाढेल. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
कर्नाटकात बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आज आला आहे. यामध्ये त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती, असे निष्पन्न झाले आहे.केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे.
दरम्यान, 67 वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलले आहे. उद्यापासून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात दोन दिवसांचे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन होणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघाने हे संमेलन पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. महिन्याभरानंतर पुन्हा हिंगणा येथे संमेलन घेतले जाण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
