नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे असा आरोप आंदोलक करत आहेत.
आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले असल्याचा देखील आरोप होत आहे. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका करत संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात देशभर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले आहे. राजधानी दिल्ली सोडून देशभरात शेतकऱ्यांनी आपापल्या भागात हे आंदोलन करावे असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या रुग्णवाहिका,शाळेच्या बसेस,यांना अजिबात अडवण्यात येणार नाहीत. यावेळी शेतकरी एकतेचे प्रतिक म्हणून सलग एक मिनिटभर हॉर्न वाजवला जाणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी किसान सभेच्या सर्व शाखा सक्रियपणे नियोजन करत आहेत. समविचारी संघटनांना सोबत घेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी व श्रमिकांना या आंदोलनात सक्रिय भागीदारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी ! अशोक चव्हाणांची केंद्राला गळ
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !

