🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याशिवाय आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याशिवाय शेतीचा शाश्वत विकास होणार नाही. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. परभणी येथे आयोजित कृषी फेस्ट कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘ मागील सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि या सरकारनेही कर्जमाफी जाहीर केली. मात्र, कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या अरिष्टावर अंतिम उपाय नाही. तसेच इस्राएलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वॉटर ग्रीड हा प्रकल्प आखला गेला आहे. पाच जिल्ह्यांच्या निविदाही निघाल्या. मात्र, या प्रकल्पाला सध्याच्या सरकारने स्थगिती दिल्याची चर्चा आहे. योजनेत काही बदल करायचे असतील तर ते जरूर करावेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत ‘वॉटर ग्रीड’चे काम थांबविण्यात येऊ नये, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, ‘सध्या वॉटर ग्रीडसह अनेक योजनांना स्थगिती देण्याचा सरकारचा इरादा दिसून येत आहे. एखादे काम करायचे नसेल तर जाणीवपूर्वक तांत्रिक गोष्टी सांगून बहाणे केले जातात. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. मुंबईत ‘नाईटलाईफ’ सुरू करून श्रीमंतांच्या पोरांची चिंता सरकारने दूर केली, पण या सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’चीही चिंता करावी, अशी टीका फडणवीस यांनी येथे केली. आधीच्या सरकारने सुरू केलेले कल्याणकारी उपक्रम बाजूला ठेवले तर विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

