Share

‘फडणवीस सरकारचा अहंकार आडवा आला…पण ‘ठाकरे’ शब्दाला पक्के असतात’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर आरेतील आदिवासी नागरिकांनी साखर वाटून स्वागत केले. तर, भाजपने यामुळं सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून सुरु झालेल्या कामाला अधिक विलंब लागेल अशी भीती व्यक्त करून फक्त काही जणांच्या हट्टापायी हा निर्णय घेतल्याची टीका करण्यात आली. यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आलं असून ‘ठाकरे’ शब्दाला पक्के असतात असा टोमणा देखील मारला आहे.

सामना अग्रलेख :

‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली. पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रातील वृक्ष, वेली, नद्या, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, कडेकपारी आज आनंदाने बहरून निघाली असतील. हा आनंद चिरकाल टिको!

मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले, ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील. पर्यावरणप्रेमींना सुखावणारा हा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाचे प्रचंड कौतुक सध्या होत आहे. मुंबईसारख्या शहराला प्राणवायू पुरवणारे आरेचे जंगल हे सव्वा कोटी लोकसंख्येचे फुफ्फुस आहे. या फुफ्फुसावर हल्ला केला असता तर मुंबईचा श्वास गुदमरला असता.

जंगले, झाडे, नद्या, समुद्र, आदिवासी वाचवायला हवेत असे नुसते बोलून भागत नाही. निसर्ग मारून विकासाची वीट रचता येणार नाही. विदर्भातील विकासातला सगळय़ात मोठा अडसर म्हणजे तेथील झुडपी जंगले. त्या झुडपी जंगलांबाबत निर्णय न घेणारे आरेतील जंगलतोडीसाठी एका रात्रीत निर्णय घेतात. दोन हजारांवर झाडे कापली जातात. त्या झाडांवरील पक्ष्यांची घरटी, त्यांची पिले तडफडून मारली जातात व या अमानुषतेविरुद्ध आवाज उठवणाऱयांना अटक केली जाते. हे प्रकार जंगलराजला लाजवणारेच होते.

आता आरेतील ‘कारशेड’ कांजूरमार्गला हलवली यावर भाजपसारख्या विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ”हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे”. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? फडणवीस सरकारने अहंकार बाजूला ठेवून पर्यावरणप्रेमींचा मान राखला असता आणि जंगलातील कारशेड कांजूरला आधीच नेली असती तर काय बिघडले असते? पण त्या वेळीसुद्धा अहंकार आडवा आला.

विरोधकांचे म्हणणे असे की, कारशेड आरेतून कांजूरला नेल्यास चार हजार कोटींचा जादा भुर्दंड सोसावा लागेल. प्रत्येकाचे आकडे वेगळे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली माहिती अगदी वेगळी आहे. कांजूरला कारशेड उभारताना सरकारला खर्च येणार नाही. कांजूरची जागा सरकारचीच आहे. त्यामुळे त्या जमिनीसाठी एक छदामही मोजावा लागणार नाही. पुन्हा ‘आरे’त जी इमारत वगैरे उभी केली आहे असे सांगतात ती इमारत इतर सरकारी कार्यासाठी वापरली जाईल. सरकारने यापूर्वी आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता 800 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. जगात सर्वत्र जंगलांवर अतिक्रमण सुरू असताना जंगलांची व्याप्ती वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. निसर्गप्रेमींसाठी हा निर्णय आशादायक आहे. आरे प्रकरणात पर्यावरणपेमींचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी केले होते. तेव्हा ते मंत्रिमंडळात नव्हते. आज ते राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत. त्यामुळे ‘आरे’चे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री कोणती पावले उचलणार, असे प्रश्न विचारले गेले; पण ‘ठाकरे’ शब्दाला पक्के असतात.

देश आणि राज्याच्या हिताच्या प्रश्नी ते कोणतीही तडजोड करीत नाहीत हे या निर्णयाने स्पष्टच झाले. सर्वत्र निसर्गाचा ऱहास सुरू झाला आहे. डोंगर कापले जात आहेत. झाडे तोडली जात आहेत. नद्या, नाले, समुद्र भराव टाकून व्यापार केला जात आहे. वाळूचा बेकायदा उपसा हा चिंतेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!