बारामती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर महावितरणची बारामती परिमंडलातील यंत्रणा अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज झाली आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जमावबंदीचा आदेश तसेच ‘घरुनच काम’ (वर्क फ्रॉम होम)चा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत 5 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयप्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर खरेदी करण्यासाठी खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून सोमवार (दि. 23) पासून वीजबिलांची छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत छपाई सुरु होईपर्यंत वीजग्राहकांना वीजबिल मिळणार नाहीत. तसेच वीजमीटरचे रिडींग सुद्धा घेण्यात येणार नाही. मात्र महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर वीजबिल उपलब्ध आहेत. यासोबतच महावितरणकडे मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड केलेल्या वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती पाठविण्यात येणार आहे. महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल ॲपमधील लॉगीन वीजग्राहकांना मीटरचे रिडींग अपलोड करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजग्राहकांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येणार आहे. त्यापुढील कालावधीत वीजग्राहकांना योग्य रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजबिल देण्यात येईल.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

