औरंगाबाद: औरंगाबाद येथे होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे मी माझा हातात घेतली आहेत. वॉर्डावॉर्डात संपर्क अभियान सुरू केले आहे. शिवसेना नेता हेच मोठे पद आहे. आणि मराठवाड्यातून हे पद मला देण्यात आले आहे. त्यामुळे आता कामाला लागा. गटबाजी चालणार नाही. तुम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे. असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आयोजित बैठकीत केले. गुरुवारी शहरातील तिरुमला मंगल कार्यालयात औरंगाबाद पूर्व मतदार संघाची बैठक पार पडली. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर(Vinod Ghosalkar) यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात शिवतेज संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेष दौरा व संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीस शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थित बैठक होणार आहेत. गुरुवारी शहरातील तिरुमला मंगल कार्यालयात औरंगाबाद पूर्व मतदार संघाची बैठक पार पडली.
यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराच्या विकासासाठी २६०० कोटी रुपये दिले होते. या निधीतून झालेल्या विकास कामांबद्दल लोकांना माहिती द्या. गटातटाचे राजकारण सोडून द्या. याचा मुख्यमंत्र्यांना त्रास होतो. असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माजी खासदार खैरे म्हणाले, मनपा निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहेत. त्यासाठी कामाला लागा. मी याचा कार्यकर्ता, त्याचा कार्यकर्ता हे अजिबात चालणार नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. जिल्हाप्रमुख त्यानंतर संपर्कप्रमुख, त्यानंतर उपनेते, मग शिवसेना नेते आणि सर्वात वर पक्षप्रमुख अशी रचना आहे. असेही खैरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या

