टीम महाराष्ट्र देशा : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सामील होतात. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे, असा संताप राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. याआधी महाराष्ट्राच्या चित्ररथाने संचलनात अनेकदा बाजी मारली आहे. या चित्ररथांद्वारे भारताच्या विविधतेची ओळख होत असते. भारत हा संघराज्य आहे व या संघराज्याला धक्का लावण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी केले, असा आरोप आव्हाड यांनी केला.
छोट्या विचारांची माणसे देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसली आहेत हे देशाचे दुर्दैव आहे. विरोधी पक्षाचे लोक सत्तेत आल्यास त्या राज्यांचा रथ घ्यायचा नाही हा बालिशपणा आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. स्वातंत्र संग्रामात महाराष्ट्र व बंगाल या राज्यातील जनतेने बलिदान केले आहे. या अपमानाचा सूड महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता. तसेच महाराष्ट्राचा चित्ररथ सुरुवातीची काही वर्षे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता.
महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोन वेळा प्रथम क्रमांकही पटकावला आहे. याचप्रमाणे 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला होता. मात्र यावर्षी चित्ररथाला सादरीकरणाची संधीही मिळणार नाही. मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर यंदा महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

