🕒 1 min read
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते. 8 जानेवारीच्या आदेशात अंशतः बदल करुन आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. ‘ABP माझा‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती.
नागरिकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र देशा’ने या बातमीचा चांगलाच पाठपुरावा केला होता. दरम्यान, आव्हाड यांची नुकतीच निवड झाली असल्याने ते काम कोणत्या पद्धतीने करतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
सोलापूरच्या विविध भागात हजारो मजूर बिनकामाचे बसले आहेत. त्यांना खायला अन्न नाही. सरकारने मोफत गहू, तांदूळ, दाळ देतो म्हणून सांगितले. कुठे आहे धान्य? लोकांच्या अडचणी कशा दूर होणार. लोक रस्त्यावर आल्यावर अडचणी दूर करणार काय? सोलापूरच्या जनतेला लवकरात लवकर धान्य मिळाले पाहिजे. यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नियमित बैठका घेतला पाहिजेत अशी मागणी होत होती मात्र पाटील हे गायबच होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
