अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राहुरीच्या राजकारणात मागील चाळीस वर्ष स्व.रामदास धुमाळ यांचा दबदबा राहिला. परंतु अडीच वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते दिशाहीन झाले होते. स्व.धुमाळ यांचे राजकीय वारसदार अमृत धुमाळ यांनी स्व.रामदास धुमाळ विचार मंच स्थापन करुन, भरकटलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुरीच्या राजकारणात धुमाळ गट पुन्हा सक्रिय होणार आहे.
स्व.रामदास धुमाळ यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. त्यांना मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात अनेक विकासकामे केली. अनेक तरुणांना रोजगार, शिक्षण, उद्योग-व्यवसायाच्या संधी निर्माण करून दिल्या. त्यांनी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे प्रपंच सावरले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते कट्टर विरोधक होते.
रामदास धुमाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या तालुक्यातील अनेक संस्था, ग्रामपंचायती, विविध सोसायट्या त्यांच्या ताब्यातून गेल्या. तसेच तालुक्यातील त्यांचे अनेक कार्यकर्ते तनपुरे, विखे, कर्डीले यांच्या गटांत सामील झाले. परंतु आता स्व.धुमाळ यांचे पुतणे मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ यांनी स्व.रामदास धुमाळ विचार मंच स्थापन करून तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे.
पंढरीनाथ पवार, डॉ. जयंत कुलकर्णी, नानासाहेब पवार, भास्कर जाधव, अशोक ढोकणे यांच्या उपस्थितीत स्व.रामदास धुमाळ विचार मंच स्थापन करण्याची घोषणा झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात धुमाळ गट पुन्हा राहुरीच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
कंगनाच्या सुरक्षेसाठी आमच्या खिशातले पैसे जाणार का ?
ठाकरे सरकार सुशांत प्रकरणी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात: अतुल भातखळकर
केवळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या- स्नेहलता कोल्हे

