औरंगाबाद : ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . 2004 ते 2014 दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले.
औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. तत्पुर्वी भव्य रोड शो काढण्यात आला. सभेला मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका केली.
फडणवीस म्हणाले, राज्यात आणि देशात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था वाईट आहे. त्यांचा विरोधी पक्ष होईल एवढी संख्या देखील त्यांच्याकडे नाही. पण आपल्या अपयशाच खापर ते ईव्हीएमवर फोडत आहेत. हा प्रकार म्हणजे एखाद्या बुद्धू मुलाने अभ्यास न करता परीक्षेला बसणे आणि नापास झाल्यावर वडीलांना पेनच खराब होता असे म्हणण्यासारखे आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था सध्या अशाच नापास झालेल्या मुलासारखी झाली आहे. जो आपल्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरतो आहे अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाजनादेश यात्रेवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर देखील फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपमध्ये यात्रेची परंपरा आहे. आम्ही विरोधात असलो तर जनतेसाठी संघर्ष करतो, म्हणून संघर्ष यात्रा काढतो. गोपीनाथ मुंडे यांना काढलेल्या संघर्ष यात्रेतूनच राज्यातील कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता गेली होती. आता आम्ही सत्तेत आहोत, पाच वर्ष केलेली काम जनतेपर्यंत पोचवून पुन्हा त्यांचा जनादेश मिळवण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महाजनादेश यात्रेच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून यात्रा काढल्या जात आहेत. पण लोकच येत नसल्याने त्यांना या यात्रा मंगल कार्यालयात भरवाव्या लागत आहेत. पंधरा वर्ष राज्यात सत्ता असतांना त्यांना जनतेचा विसर पडला. केवळ माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. म्हणून 2014 आणि आता 2019 मध्ये देखील केंद्रात त्यांच्या विरोधी पक्ष नेता नाही. महाराष्ट्रात देखील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल एवढे आमदार निवडूण येणार नाही असा दावा देखील फडणवीस यांनी केला.


