टीम महाराष्ट्र देशा- जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांना उत्तम प्रशासन हवं आहे. त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही. तिथल्या नागरिकांनी ‘पुन्हा गावाकडे’ या योजनेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला असून बंदुक आणि तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद कित्येक पटींनी मोठी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते. काश्मीरच्या नागरिकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर अगदी दोन्ही बाजूनी गोळीबार होतं असलेल्या सीमेवरच्या गावांपर्यंत अधिकारी जात असून सरकारी योजनांची माहिती देत आहेत. शोपियान, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अधिकारी जात आहेत, काम करत आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
चांद्रयान-२ विक्रमी वेळेत अवकाशात सोडणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही प्रशंसा पंतप्रधानांनी केली आहे. तरुणांसाठी अंतराळाशी संबंधित कुतूहल, भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धेची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला या स्पर्धेचा तपशील दिला जाईल.
या स्पर्धेत प्रत्येक राज्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, सप्टेंबरमध्ये जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्या क्षणाचा श्रीहरिकोटा येथून साक्षीदार होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

