पंढरपूर- मराठा आरक्षण तसंच इतर न्यायहक्काच्या मागण्यांसाठी मराठा समाजाचे आंदोलन कर्ते पंढरपूर पासून मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजाची गर्दी होऊ नये यासाठी काल मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर कडे जाणारी एस टी वाहातूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
या व्यतिरिक्त पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीनं मराठा आरक्षण मागणीसाठी उद्या पंढरपूरहून पायी दिंडी निघणार असून ती पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने जाईल.
शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे की, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी 7 नोव्हेंबर 2020 पासून पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनांनी मराठा समाजातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले आहे. मोर्चामुळे एस.टी. बसमध्ये आंदोलनकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सुरक्षित अंतराचे पालन होणार नाही. आंदोलनकर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो.
कोविड 19 आजाराचा प्रसार होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या एस.टी. बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात 6 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून ते 7 नोव्हेंबर 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. ही संचारबंदी महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी लागू राहणार आहे.
नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. पंढरपूर शहरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास/जमण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील मोर्चात सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना 5 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासून ते 7 नोव्हेंबर 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि कायदे यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद
- अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
- टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन
- राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी;चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- शेतकरी विरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

