टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. तसेच शहरे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषगांने मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वच जण चांगले काम करत आहेत. मात्र, सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर राहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. रस्त्यांवरुन चालताना नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात यावे.
राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. तसेच ओला व सुका कचरा शंभर टक्के वेगळा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येक शहराने जाहिरात फलक धोरण (होर्डिंग पॉलिसी) तयार करावे. त्यावर कोणते संदेश देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमृत वन योजनेअंतर्गत शहरातील मोकळ्या जागांवर वन निर्माण करणाऱ्या बार्शी, नवी मुंबई, नाशिक, सांगली, उदगीर, अचलपूर आदी शहरांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्वच शहरांमध्ये अमृत वन प्रकल्प राबविण्यात यावा. तसेच अशी अमृत वने दीर्घकाळ टिकावीत यासाठी या ठिकाणी देशी झाडे लावण्यात यावीत. तसेच अशी ठिकाणे कायमस्वरुपी राहावीत, यासाठी त्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
मोठ्या शहरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे – शिंदे
नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, शहरातील रस्ते, पदपथ यांची स्वच्छता व सुरक्षितता महत्त्वाची आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी मोठ्या शहरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. राज्यातील शहरांचा दाखला इंदोरसारख्या इतर शहरांनी घ्यावा, अशी परिस्थिती करण्यात यावी. तसेच घातक कचरा, जैववैद्यकीय कचरा, ई कचरा यासंदर्भातही प्रभावीपणे काम करावे लागणार आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, पनवेल या महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

