मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधीचे कर्ज असताना देखील आता शेतकऱ्यांना नवं कर्ज घेता येणार आहे. यामुळे आता साधारण ११ लाख शेतकर्यांना खरीपाचे नवं कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे आधीचे कर्ज अंगावर असताना हे कर्ज मिळणार आहे, त्यामुळे कोरोनाच्या काळात फटका बसलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबतचे वृत्त झी 24 तासने प्रसिद्ध केले आहे.
कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही.कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड होते. मात्र ११.१२ लाख शेतकर्यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत. या शेतकर्यांच्या कर्जाची थकीत रक्कम राज्य सरकारच्या नावे करून शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याचा यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे ११.१२ लाख शेतकर्यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये राज्य सरकार व्याजासह बँकांना देणार आहे.
दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. राज्यातील ३२ लाख शेतकर्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. मात्र निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती.या खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ होते भेटीचे कारण…


