मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या करुणा शर्मा नामक महिलेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. करुणा शर्मा या स्वत:ला धनंजय मुंडे यांच्या पत्नी मानतात. तसेच सोशल मीडियावर त्या नेहमी त्यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा करतात. दरम्यान, आज धनंजय मुंडे यांच्या परळीत जाऊन अनेक विषयांची पोलखोल करण्याचा इशारा करुणा यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
मात्र, त्यांच्या या इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील सुषमा सिंह यांनी प्रसार माध्यमांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात की, करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर आता परळी येथून पत्रकार परिषद घेत विविध कॉल रेकॉर्ड, व्हाट्सअप्प चाट यासारखे साहित्य प्रसिद्धीस देणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु या प्रकरणात २८ जानेवारी २०२१ झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट व संवेदनशील असल्याने धनंजय मुंडे यांच्याबद्दलचे काहीही प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यात करुणा शर्मा यांना निर्बंध घातलेले आहेत.
असे असताना कथित करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो. त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील सुषमा सिंह यांनी सर्व प्रसार माध्यमांना पाठवले आहे.
या प्रकरणात सातत्याने विविध प्रकारचे आरोप करून बदनामी करत मोठ्या स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचे यापूर्वीच धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी न्यायालयात देखील स्पष्ट केलेले आहे. तसेच सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य प्रसिद्ध करणे हे त्या प्रकरणाच्या निकालावर देखील परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान केला जाऊ नये असे वकील सुषमा सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

