टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकी नंतर सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात येणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. खासकरून भाजपने आतापासूनच दिल्लीत जनतेचे मन आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या छाणणी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेते माजी खासदार राजीव सातव यांची निवड करण्यात आली आहे.
पुढील वर्षी 15 फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसकडून तिकीट वाटपाची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर आली आहे. दिल्ली विधानसभेत 70 जागा असून गेल्या वेळी काँग्रेसला येथून खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र या निवडणुकीत पक्षाने राजीव सातव यांच्या खांद्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देऊन विजयाची तयारी केली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या सरकारमध्ये कॉंग्रेसचा सहभाग आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं सपष्ट झाल आहे. तर या विधानसभेला कॉंग्रेस समोर आम आदमी पार्टीचे मुख्य आव्हान असणार आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळणी केली आहे. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठीचं आम आदमी पार्टीने प्रशांत किशोर यांची साथ घेतली असल्याचं दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीची मुख्य लढत ही भाजप सोबत असणार आहे. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

