टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती पद भाजपला मिळाले आहे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, संख्याबळ असतानाही कॉंग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागल्याने पक्षांतर्गत कलगीतुरा सुरु झाला आहे.
प्रथमच सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर सोलापूर बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी पार पडली होती, निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनल विरोधात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत आघाडी केली होती. यामध्ये १८ पैकी १६ जागांवर देशमुख – माने गटाला विजय मिळाला होता, तर सहकारमंत्र्यांच्या पॅनलला केवळ दोन उमेदवार विजयी करता आले होते.
निवडणुकीनंतर प्रथम माजी आ दिलीप माने यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. माने यांनी ठरल्यानुसार मागील पंधरा दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सभापती निवडीत मोठे नाट्य रंगले होते. अखेर विजयकुमार देशमुख यांनी मित्रपक्षांतील सदस्यावर कुरघोडी करत सभापती पद आपल्या पारड्यात पाडून घेतले आहे. दरम्यान आता माने यांनी कॉंग्रेस विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बळीराम साठे यांनी दिलीप माने यांच्यावर निशाणा साधला आहे. दिलीप माने यांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कोणतीच गोष्ट सरळ केली नाही. जाणीवपूर्वक त्यांनी बाजार समितीत राजकारण केले. आता वेळ आल्यावर आम्ही आमची ताकद दाखवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कॉंग्रेस नेते शेळके यांनी माने यांच्या विरोधात थेट दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विरोधात निवडणूक लढविली नाही, तर नाव सांगणार नाही. अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

