उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात होत असलेला विलंब पाहता सर्व तक्रारीचे पंचनामे करण्याऐवजी विमा कंपनीने रँडम सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगामामधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान जोखीम अंतर्गत २५ ते ३० टक्के पुर्वसुचनांचे रँडम सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
उस्मानाबाद, कळंब तालुक्यासह जिल्ह्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२ मंडळात पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान होत असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिसकावून घेतला आहे. पीकविमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती विमाकंपनीला ऑनलाइन करून कळविण्यास सांगितले होते. त्यात काही अडचणी येत असतील तर गावचे कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करून माहिती देण्याचेही आवाहन आमदार पाटील यांनी केले होते.
या वर्षी जिल्ह्यातील सहा लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकविमा भरून आपली पिके विमा संरक्षित केली. मात्र आजपर्यंत पिकविमा कंपनीस नुकसानीची माहिती कळविणाऱ्याची संख्या दोन लाख ८३ हजार आहे. अजूनही पिकविमा कंपनीस तक्रार दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या अर्जाची संख्या अजून वाढणार आहे. ज्याप्रमाणात तक्रार दाखल करण्याची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणात विमाकंपनीने पंचनामे केलेले नाहीत. अजूनही दोन लाख नऊ हजार पंचनामे होणे शिल्लक आहे. विमा मिळण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणे गरजेचे आहे, यामुळे शेतकरी पिक काढण्यासाठी वाट पाहत होते. मात्र, विमा कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैयक्तिक पातळीवर पंचनामे होणे शक्य नाही.
वाढती अर्जसंख्या आणि अपुऱ्या मनुष्यबळाने होणारे पंचनामे याची बरीच मोठी तफावत आहे. विमा कंपनी विविध कारणे देऊन नुकसानभरपाई देण्याचे टाळत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कंपन्यानी पंचनामे होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे पदरात पडणारे १० ते २० टक्के सोयाबीनही पंचनाम्याच्या अभावी पदरात पडणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विमा कंपनीला पंचनामे करण्यात होत असलेला विलंब याचा विचार करुन आपण विमा कंपनीने रँडम सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. यानुसार प्रधानमंत्री पिकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जोखीम अंतर्गत २५ते ३० टक्के पुर्वसुचनांचे रँडम सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानी आदेश काढले आहेत. अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- सुडभावनेने कितीही कारवाया झाल्या तरी मराठ्यांच्या हक्काचा लढा लढणारच; मराठा आंदोलकाचा ‘ठाकरे सरकार’ला इशारा!
- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक
- शिवसेना, शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर; फक्त हाक द्या, आ. दानवेंचे शेतकऱ्यांना आश्वासन!
- ‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे!’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी


