पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पुणे ग्रामीण मंडलमधील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच थकबाकीदार ९५२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून या वर्गवारीतील १८९९० थकबाकीदारांनी २२ कोटी ९१ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरात पुणे शहरातील वाणिज्यिक व औद्योगिक ५२८१ ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी २९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. तर ६६४८ थकबाकीदारांनी ८ कोटी ५५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील २३१७ थकबाकीदारांचा २ कोटी ५६ लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर ६६४१ थकबाकीदारांनी ५ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील १९२२ ग्राहकांचा २ कोटी ४२ लाखांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर ५७०१ ग्राहकांनी ८ कोटी ६२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र, ई-वाॅलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ऍ़पद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून मीटर रिडींगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. यासोबतच वीजबिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींच्या माहितीसह वीजबिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना पाठविला जात आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील ‘एसएमएस’द्वारे दिली जात आहे.
तसेच यंत्रमागधारकांसाठी अनुदान वाढ करण्यात आलेली आहे. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना प्रतियुनिट मिळणाऱ्या विजेच्या अनुदानात आणखी ७५ पैसे वाढ करण्यात आली आहे. आता यंत्रमागधारकांना एकूण ४.१५ रुपये प्रतियुनिट अनुदान देण्यात येईल.
यासोबतच नागपूरमधील देवी मंदिर कोराडी परिसर येथे नाविन्यपूर्ण ऊर्जा पार्क तयार करण्याचे या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

