टीम महाराष्ट्र देशा : बुरखा बंदीच्या अग्रलेखावरून नीलम गोऱ्हे आणि संजय राऊत हे दोन नेते आमने-सामने आल्यानंतर दिव्यात शहरप्रमुख तथा उपमहापौर रमाकांत मढवी आणि उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांच्यात मुंब्रा कॉलनी विभागप्रमुखपदावरून चांगलीच जुंपल्याचे फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांकडून जाहीर झालेल्या दिवा शहरातील विभागप्रमुखांच्या नियुक्त्या डावलून दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी स्वत:च्या भावाची मुंब्रादेवी कॉलनी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचा आरोप करून नाराज झालेल्या पाटील यांनी मढवी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावल्याची चर्चा दिव्यात चांगलीच रंगली आहे.
मुंब्रादेवी कॉलनी विभागप्रमुखपदी नगरसेवक पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते भालचंद्र भगत यांची नियुक्ती मातोश्रीवरून जाहीर झालेली असताना पक्षाचा निर्णय डावलून मढवी यांनी मनमानी करून आपल्याच भावाला या भागात विभागप्रमुख केल्याचा आरोप पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मढवी शिवसेनेत नव्याने आलेल्यांना चांगली वागणूक देत नसल्याने त्याचा परिणाम पक्षवाढीवर होत असून दिव्यातील नगरसेवक पाटील यांच्यासह पक्षातील कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम ते करत असल्याचे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

