🕒 1 min read
कोल्हापूर: गेल्या वर्षी याच दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजवला होता. कित्येक जनावर, नागरिक वाहून गेले होते तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. तर, मागच्या पुरातून सावरेपर्यंत कोरोना महामारीचा विळखा राज्याला बसला. यानंतर आता कोरोनाच्या संकटासह पुन्हा अस्मानी संकट देखील कोल्हापूर जिल्ह्यावर घोंघावताना दिसत आहे. आज सकाळपासून देखील पावसाचा जोर जिल्ह्यात कायम आहे.
गेल्या तीन दिवसात सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली गेल्याचे समजते. तर, अनेक गावांचा संपर्क आता तुटला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट एवढी आहे, तर धोक्याची पातळी ४३ फूट आहे.काल (दि. ५ ऑगस्ट) रात्री १० च्या सुमारास राजाराम बंधारा येथे नदीची पाणी पातळी ३९ फुटांवर गेली होती. राधानगरी धरण देखील काल संध्याकाळी ९० टक्क्यांवर भरले असल्याने कोणत्याही क्षणी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून विसर्गास सुरुवात होऊ शकते.
ज्यांचं सरकार आहे ते श्रेय घेणारच;संजय राऊत यांनी काढला भाजपला चिमटा
तर, याआधीच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी काठच्या गावांतील लोकांना जनावरांसह, कुटूंबतील सदस्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. यानंतर, चिखली गावांतील लोकांनी स्थलांतरास सुरुवात केली. कोल्हापुर शहरातील शाहूपुरी सारख्या सखल भागात देखील पाणी शिरले असून नागरिकांना वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सेक्युलर देश आहे,आज लोकशाहीचा पराभव झाला;ओवेसींचा जळफळाट
दरम्यान कोल्हापूरच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला आहे. ठाकरेंनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच अतिरिक्त मदत लागल्यास तात्काळ संपर्क करायलाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच, मागील वर्षीच्या परिस्थितीतून धडा घेत, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे एनडीआरएफ (NDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील रंकाळा, कळंबा तलाव देखील भरले असून, कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी, नाले देखील तुडुंब भरून वाहत असून आज देखील हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
