कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घटनांवर भाष्य केलं आहे.राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्यानं ते पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपा त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत असल्याचं म्हटलं आहे.
पवारांच्या या वक्तव्याचा भाजपा प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. गेल्या पंचवीस वर्षांत दोन-अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे, साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
आम्ही ज्यांना पक्षात घेत आहे त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या कारवाईबद्दल हरकत असेल तर न्यायालयात दाद मागावी, आम्ही काय कुणाला अडवलेले नाही असं पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे. ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत असा आरोप महाजनांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

