मुंबई : मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच उर्वरीत मागण्यांसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. बीड जिल्ह्यात परळीत बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आंदोलकांनी दुपारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच होते.
दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
