🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नामांतराचा मुद्दा गाजत आहे. भाजप आणि रिपाइं निवडणुकांना एकत्र सामोरे जात असतानाच मित्रपक्षांमध्ये मतांतरं दिसत आहेत.यातच औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे.
शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र राज्य शासनाने जर ठरवले, तर नावात बदल केला जाऊ शकतो, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे आणि मगच लोकांना मते मागावी, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा कठोर शब्दात कन्नडचे माजी आमदार तथा मनसेचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सरळ इशाराच दिला आहे.गेली अनेक वर्ष औरंगाबादचे संभाजीनगर करणार या एकाच मुद्द्यावर शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजून घेतली, आणि आता पुन्हा संभाजीनगर आणि हिंदू-मुस्लीमच्या मुद्द्यावर शिवसेना महापालिका निवडणूक लढू पाहत आहे.यावर हर्षवर्धन यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपपदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही मागणी केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

