मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची आणि सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य साठी आपण केलेल्या पूल टेस्टिंग व प्लाजमा थेरपी या मागणीला मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच यावेळी महाराष्ट्र राज्याच्या आतापर्यंतच्या कामाचे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी कौतुक केले. Portable Pulse Oxymeter व Portable X Ray Daignosis ची मदत घेऊन लवकर रुग्ण निदान करून मृत्यूदर कमी करणे, PPE चे Sterlization करून पूनर वापर करण्यासाठी सुचविलेल्या मुद्द्यांचे विशेष कौतुक केले, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याच्या मागणीला प्रतिसाद दिल्याचेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


