मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला होम क्वारंटीन राहणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. मात्र, २ एप्रिलला प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावं लागत असल्याचे त्याने ट्विटद्वारे सांगितलं होतं. दरम्यान, ८ एप्रिलला सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सचिन तेंडुलकरने रुग्णालयात दाखल व्हायला नको होते असं विधान केलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जम्बो कोव्हीड सेंटर्ससह खाजगी रुग्णालयांमध्ये देखील आता बेड्स उपलब्ध नसल्यच दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी हे विधान केलं आहे.
‘जे सेलिब्रेटी आहेत, ते आपल्या घरामध्येही उपचार घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन बेड्स अडवू नयेत. सचिन तेंडुलकर किंवा अक्षय कुमारसारखे सेलिब्रेटी हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही,’ असं विधान अस्लम शेख यांनी केलं आहे.
‘सध्याच्या घडीला मुंबईमध्ये हॉस्पिटल्सची काय अवस्था आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे जे गरजू लोकं आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार सेलिब्रेटींनी नक्कीच करायला हवा,’ असं शेख एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : कडक निर्बंधांना कोणी जुमानेना, आता निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता !
- ‘आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला’
- फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे
- सर्क्युलरच्या गोंधळामुळे पुण्यात गरिबांना शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागले पैसे !
- कुस्ती स्पर्धांना परवानगी द्या, कुस्तीपटूंना आर्थिक मदत देण्याची मागणी


