औरंंगाबाद : जिल्ह्यातील सर्व जनतेने पाळलेली स्वयंशिस्त, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाने केलेल्या उपाय योजना यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झाले आहे. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (दि.१२) केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रमजान ईदच्या पाश्र्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महानगर पालिकेचे सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, शहरातील मुस्लिम धर्मगुरू यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत जनतेने कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाला पूर्णत: सहकार्य केले आहे. यापूर्वीही विविध सण उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याच्या आवाहनाला जनतेने पूर्णपणे सहकार्य केले आहे. नमाज पठण, भेटी-गाठी किंवा बाहेर एकत्र नमाज पठण यासाठी घराबाहेर न पडता कोरोना प्रतिबंधासाठी घरातच ईद साजरी करावी असे आवाहन आपल्यामार्फत मी मुस्लिम बांधवांना करीत आहे. मला विश्वास आहे की, आतापर्यंत जसे सहकार्य केले आहे तसे सहकार्य ईद साजरी करण्याबाबतही राहील.
पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता म्हणाले की, रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळून सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. याबाबत आपले सहकार्य उत्तम राहिले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घरात राहून ईद साजरी करावी. पोलीस प्रशासन २४ तास कर्तव्य करित असून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केले.
माजी महापौर रशिद मामू यांनी ईद साजरी करण्याबाबत सर्व मुस्लिम बांधवांचे सहकार्य राहील. कोरोना महामारी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी अल्लाहकडे दुवा मागितली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. अब्दुल रशिद मदनी यांनी ईद साजरा करण्याबाबतच्या राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन ईद साजरी केली जाईल याबाबत आश्वस्त करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने सर्व धर्मगुरूंच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो असे यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- बॉलीवूडमध्ये टिकणे झाले अवघड, कंगनाच्या हातातून निसटले अनेक ‘एंडोर्समेंट’
- महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर


