बीड: एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे आठवडी बाजार बिनधास्त भरवणं सुरु आहे. आठवडी बाजारांवर बंदी असूनही केज येते शुक्रवारी आठवडी बाजार भारला. या बाजारात कोरोना नियमांचे कुठल्याच प्रकारे पालन झाले नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा असा काही प्रकार सुद्धा आहे याचा तर विसरच पडला असल्याचे दिसून आले. आता प्रश्न असा उपस्थित होतोय, याला जबाबदार कोण ? नियोजनशून्य नगरपंचायत की बेशिस्त नागरिक?
केज शहरात नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभार आणि दुर्लक्षामुळे शुक्रवारी आठवडी बाजार भरला. भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून तोंडाला मास्क नसणारे नागरिकही बाजारात वावरल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत शासनाने लॉकडाऊन केलेला असतानाही अशा बेजबाबदार वागण्याने कोविडची साखळी तुटणार कशी? असा प्रश्न काही सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना केज शहरातील नागरिक गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. तहसीलदार दुलाजी मेंडके आणि पोलिस कर्मचारी शहरातून फेऱ्या मारत असताना शिस्त लागत नसल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्याच्या सूचना देऊन सतत गैरहजर राहत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र, त्याचाही प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर परिणाम झालेला नाही. भाजीपाला विक्रेते गल्लोगल्ली फिरून विक्री करत असताना नागरिक भाजीपाल्याच्या नावाखाली मुक्त संचार करत असून संचारबंदी नावाला असल्याचे चित्र दिसून येते. याकडे नगरपंचायतीसह पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन मोकाट आणि तोंडाला मास्क नसणाऱ्या नागरिकांवर नियमानुसार कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेळेत रेमडेसिवीर मिळाले,अन ४ वर्षांच्या चिमुकल्याने केली कोरोना आणि हृदयरोगावर मात!
- सकारात्मक! बीडमध्ये ४७१७ जणांची स्वॅब टेस्ट ३१९७ आले निगेटिव्ह
- वाहन चोरीचे सत्र थांबेना, चार दुचाकी लंपास
- दारू पिण्यासाठी जागा देण्याऱ्या हॉटेलवर कारवाई
- महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये विशेष लसीकरण; मात्र लसीसाठी नोंदणी आवश्यक

