🕒 1 min read
पुणे : मी नथुराम गोडसे बोलतोय आणि हे राम नथुराम या प्रसिद्ध नाटकातील नथुराम यांची भूमिका करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक विधान केले आहे. अभिनेते शरद पोंक्षे हे अनेकदा सामाजिक – राजकीय गोष्टींवर मत मांडताना दिसून येतात. नुकतंच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी जाती आणि जातीयवादाच्या संदर्भात केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
शरद पोंक्षे हे गेल्या काही दिवसांपासून ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे चर्चेत आहे. अनेकांनी या नाटकांना वेळीवेळी विरोध केलेला आहे. गांधीवाद, गांधी विचारांना विरोध करणारे हे नाटक आहे, अशी टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी हे नाटक करणे बऱ्याच काळापासून थांबवले आहे. असे असले तरी अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रातून शरद पोंक्षे विचार मांडताना सतत दिसत असतात. नुकतंच पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी जातीयवादावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
“अनेक जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा होता. मात्र, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे”, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण समाजाला केली आहे.
“मी गेले १५ वर्षे जात संपविण्यासाठी व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा गर्व नाही. जात ही संपलीच पाहिजे. त्यापेक्षा मनुष्य धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे, पण त्यासाठी प्रयत्न करु नये, असे म्हणून चालणार नाही. कारण कधीतरी जात संपवण्यात कधीतरी यश मिळेल आणि आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल”, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

