पुणे – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आपली व्यथा मांडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपसोबत मैत्री टिकवली असती, तर आता मी मुख्यमंत्री असतो, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काँग्रससोबत आघाडी करून 12 वर्षांत आपण जे कमावले होते, ते सर्व गमावले आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.
काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे.
काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वामी यावेळी म्हणाले.काँग्रेसशी 2018 मध्ये आघाडी केल्यावर सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटाने आपली प्रतिष्ठा धुळीत मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. एच.डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार आपण काँग्रेसशी आघाडी केल्याने आपण काँग्रेसच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आता कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांचे महाराष्ट्रात पडसाद पडू लागले आहेत.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस हा पूर्णपणे लोकांच्या नजरेतून उतरलेला पक्ष आहे जे जे पक्ष काँग्रेस बरोबर गेले त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आपण पाहिले आहे मग ते उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी असुद्या, बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दल असुद्या किंवा कर्नाटक मध्ये जनता दल सेक्युलर असुद्या, महाराष्ट्रातही शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर हेच दिवस येणार आहेत यात काही शंका नाही असं गावडे यांनी म्हटलं आहे.
लोकांनी पूर्णपणे नाकारलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ला उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी सत्तेत बसवण्याचे पाप त्यांनी केले आहे त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतील असं गावडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या

