बीड : बीड जिल्ह्यातील राजकारण हे प्रामुख्याने मुंडे घराण्याभोवती फिरत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पंकजा मुंडे या परळीमध्ये ठाण मांडून आहेत. नुकतीच त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली. तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. याच दरम्यान त्यांनी आता धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या परळी नगर पालिकेवर निशाणा साधला आहे.
परळी नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सुका व ओला कचऱ्याचे विभाजन करून कंपोस्ट खतनिर्मिती करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे भासवून राज्य शासनाकडून भुयारी गटार योजनेचे १२० कोटी रुपये मंजूर करून घेतले. असे असताना नैसर्गिक सौंदर्य असलेल्या डोंगरमाथ्यावर कचरा डेपो उभारून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.
परळी नगरपालिकेने नंदागौळ रोडवरील कचरा डेपो शहराच्या दक्षिणेकडील डोंगरमाथ्यावर हलवल्याने या परिसरात मॉर्निंग वॉक व निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात विरंगुळ्यासाठी येत असलेल्या नागरिकांकडून विरोध होत आहे. पंकजा मुंडे यांनी कचरा डेपोची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा म्हणाल्या, परळी शहरासाठी १२० कोटींची भुयारी गटार योजना मंजूर करताना पालिकेने शहरातील कचऱ्याचे विघटन नियमाप्रमाणे केले जात असल्याचे भासवले. ही योजना मंजूर होईपर्यंत ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जात असल्याचे कागदोपत्री दाखवले.
सध्या कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाची स्थिती काय आहेॽ सध्याच्या कचरा डेपोसमोरील डोंगरमाथ्यावरील गायरान जमीन मिळवून तेथील खदानीत कचरा साठवण्यास सुरुवात केली आहे. या कचरा डेपोच्या बाजूला वन खात्याची जमीन असल्याने तिथे वन्यजीवांचा संचार असतो. या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आणि वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या रक्षणासाठी गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे पंकजा यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत

