पंढरपूर : बारामतीकरांचा कुठलाही दबाव न बाळगता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण या नवीन रेल्वे मार्गाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निम्मा निधी द्यावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नावर बोलण्यासाठी रविवारी पंढरपूर येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. रेल्वे प्रश्नावरील जवळपास 500 विविध मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत.
यावेळी बोलताना सोलापूर मंडळातील प्रवाशी आणि जनतेच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक व प्रलंबित कामांना गती देणार असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक-निबांळकर यांनी सांगितले. नागरिकांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोयी-सुविधा मिळण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं निंबाळकर यावेळी म्हणाले.
प्रस्तावित मार्गाला १२०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यातील ५० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो. उर्वरीत ५० टक्के निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे पंढरपूरकरांना नाराज करणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

