Share

सरपंच म्हणाले ५५००० झाडे जगवलेली पहायला येणार का? वनमंत्री म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपन या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे देण्यासाठी राज्यात आवाज दो नावाने स्थायी स्वरूपाची यंत्रणा निर्माण करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामपंचायतींशी साधलेल्या ई- संवादात केली.

मुनगंटीवार यांनी पार्थ लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी ई- संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ई- संवाद कार्यक्रमात हजारो व्यक्तीनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.

सुसंवाद सभा घेणार

वन विभागाच्या योजना जिल्हा आणि तालुकास्तरावर पोहोचवण्यासाठी तीन महिन्याच्या आत राज्यभर "सुसंवाद सभा" घेणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिली. ते पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक जागांवर रोहयोमार्फत फळझाडं लावण्यासंदर्भात काय करता येईल यासंदर्भात आपण चर्चाकरून लवकरच निर्णय घेऊ. वृक्षलागवडीसंदर्भात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली वृक्षलागवड संवर्धन आणि संगोपन समिती स्थापन केली जाईल आणि गावपातळीवर वृक्षलागवड आणि संवर्धनासंदर्भातील पर्यवेक्षकीय यंत्रणा निर्माण केली जाईल अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

गावाने पर्यावरण रक्षणाचे सेनापती व्हावे

गाव पुढे गेला तर देश आपणहून पुढे जाईल असे सांगून वनमंत्र्यांनी प्रत्येक गावाने ग्रीन आणि क्लिन व्हिलेज होण्याचा संकल्प करावा, वनासाठी मनापासून काम करावे असे आवाहन केले. इतर काय करतात हे पाहण्यापेक्षा मी या मोहिमेत काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दिलखुलास संवाद

वनमंत्र्यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या अनुषंगाने दिलखुलास संवाद साधला. विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी अनेक शंकांचे निरसन ही केले.

सुनंदा देवधर यांनी व्हॉटसॲपवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना औषधी वनस्पतींसाठी मोठ्याप्रमाणात रोपवाटिका विकसित करण्यात येत असून त्यादृष्टीने आयुष मंत्रालयाशी चर्चा झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सरपंच आकाश कांबळे यांनी वनसंरक्षक समित्यांना जास्तीचे अधिकार द्यावेत अशी मागणी यावेळी केली. त्यावर उत्तर देतांना वनमंत्री म्हणाले की, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना अधिक अधिकार देण्यासंदर्भात आपण नक्की विचार करू. बीड जिल्ह्यातील सरपंच केशवराव आंधळे यांनी दुष्काळग्रस्त भागातील झाडे जगवण्यासाठी प्रयत्न झाले तरच हे अभियान यशस्वी होईल असे मत व्यक्त केले तसेच त्यांनी यावर्षी ३० हजार झाडं लावल्याची माहिती ही दिली. त्यावर वनमंत्री म्हणाले की, मराठवाड्याचे वनक्षेत्र अतिशय कमी आहे म्हणूनच या भागाला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते हे लक्षात घेऊन तेथील वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इको बटालियनची स्थापना त्याच हेतूने करण्यात आली आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत कामे, नदी जोड प्रकल्प यातून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर शाश्वत उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठवाड्याचे २१ टिएमसी पाणी देण्याचाही प्रयत्न सुरु आहे. लावलेली रोपे जगवण्यासाठी पाणी देण्याच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आपण सूचना देऊ परंतू पाण्याची टंचाई आहे म्हणून वृक्षलागवड आणि संवर्धनाचे काम थांबवणे मराठवाड्याच्या हिताचे नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय धनवटे या सरंपचांनी गावात २५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत २०८०० झाडं लावल्याचे सांगितले. उर्वरित झाडं लावण्यासाठी रोपांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर वन विभाग यासंदर्भात आपणास नक्की मदत करील अशी ग्वाही वनमंत्र्यांनी दिली. हिरव मन घेऊन हिरवा महाराष्ट्र घडवण्यासाठी या मिशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी शासन उभं राहील असंही ते म्हणाले. शहरांप्रमाणे गावाचा टीपी प्लान अर्थान ट्री प्लान तयार करण्यासंदर्भात शास्त्रीय अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यासाठी आग्रही आहेत. बचतगटांच्या माध्यमातून ते याठिकाणी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. यातून महिलांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. झाडांपासून डिझेलची कल्पना राबविण्यासाठी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल सारख्या कंपन्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. राज्यात बांबूचे क्लस्टर उभारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

पंधराव्या वित्त आयोगात वृक्षलागवडीला विशेष वेटेज

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाच्या सुत्रामध्ये वृक्षलागवडीसाठी ७.५ टक्क्यांचे वेटेज देण्यासंदर्भात राज्याने आपली मागणी नोंदवल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले की, जी ग्रामपंचायत वृक्षलागवड कार्यक्रमात मन लावून काम करील त्यांना पंधराव्या वित्त आयोगात अधिकचा निधी मिळेल.याशिवाय विभागाला उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीच्या अर्धा टक्का रक्कम ही वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी खर्च करण्याची मान्यता आधीच देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेला हा निधी पंचायतींनी खर्च करावा असे आवाहन ही त्यांनी केले.

पारगांवचे सरंपच प्रकाश देशमुख यांनी गावात ४० हेकटरचे वन निर्माण केल्याचे सांगितले. त्याला अभयारण्याचा दर्जा देता येईल का अशी त्यांनी विचारणा केली तसेच वृक्ष लागवडीसाठी निधी देण्याची मागणी ही त्यांनी केली. त्यावर इतक्या छोट्या वनक्षेत्राला अभयारण्य घोषित करता येत नाही परंतू यासाठी वेगळे नाव देऊन त्या वनक्षेत्राला संरक्षित करता येईल का याचा आपण नक्की विचार करू असे उत्तर वनमंत्र्यांनी दिले.

चेहऱ्यावरचे हास्य सर्वात महागडे कॉसमॅटिक

चेहऱ्यावरचे हास्य हे सगळ्यात महागडे कॉसमॅटिक असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आता देशाच्या आणि राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नापेक्षा पर कॅपिटा हॅपीनेस किती याला महत्व प्राप्त झाले आहे. काही गावांमधील सरपंच वृक्षलागवडीत अतिशय उत्तम काम करत असल्याचा उल्लेख ही त्यांनी आवर्जुन केला. राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी वन विभागाने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात याक्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, व्यक्ती आणि मान्यवरांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. माधवी झनक या महिला सरंपंचानी बीओटीच्या तत्वावर झाडं लावण्याचे काम करता येईल का अशी विचारणा केली. तसेच लावण्यात येणारी रोपे मोठी असावीत असे मत ही व्यक्त केले. त्यावर त्रिपक्षीय करारातून वृक्षलागवड करता येईल असे उत्तर वनमंत्र्यांनी दिले.ट्री शेअर, ट्री क्रिडिट सारख्या नावीन्यपूर्ण संकल्पनावर काम सुरु असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

आसरे गावच्या सरंपंचाचे वनमंत्र्यांना आग्रहाचे निमंत्रण

नंदूरबार जिल्ह्याच्या आसरे गावचे सरपंच चंद्रकांत पाटील यांनी आम्ही यावर्षी ५५००० झाडे लावली. ती आम्ही पूर्ण जगवणार अशी ग्वाही वनमंत्र्यांना दिली एवढच नाही तर त्यांनी जगवलेली झाडं पाहण्यासाठी जुन २०२० ला आमच्या गावात याच असे आग्रहाचे निमंत्रण ही वनमंत्र्यांना दिले. त्यावर मी जसे पुस्तकं वाचतो तसेच चेहरे ही वाचतो तुम्ही लावलेली रोपे जगवणारच हा संकल्प तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तरीही मी तुमचं निमंत्रण स्वीकारतो,असा शब्द ही वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!