बीड : पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कळंब तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याच्या ४६ कोटी रुपयांच्या साखर अफरातफर प्रकरणी ही कारवाई केली. १ लाख १४ पोते साखरेच्या पोत्यामध्ये अफरातफर केली असा प्रशासनाने आरोप ठेवला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील बँक अधिकाऱ्याच्या अटकेने राजकीय व सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालक आहेत.
हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी १२ मार्च २०२१ रोजी कळंब ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचा चेअरमन दिलीप आपेटसह ४० जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोघांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. २ सप्टेंबर रोजी परळी येथून वैद्यनाथ बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना पोलिसांनी परळी येथून ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण ?
हावरगाच्या शंभू महादेव साखर कारखान्याने २००२ ते २०१७ या कालावधीत ४७ कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. १ लाख ५४ हजार १७७ एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली असल्याचे उघडकीस आले होते.
वैद्यनाथ अर्बन बँकेवर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात या बँकेच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात भाजपला एका हाती सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांना वाटतोय विश्वास
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


