मुंबई : कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुढील काही काळ राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, “चीनमधील वुहानमध्ये आता रुग्ण वाढत नाही, कारण त्यांनी वुहानमधील सार्वजनिकपणे एकत्र येण्यावर निर्बंध लावले आहेत. लोकांना विलगीकरण करुन ठेवण्यात आलं आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. म्हणूनच आम्ही देखील महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही राजकीय कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर त्यावरही लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास शाळांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे, ‘जे कोरोनासंसर्गित रुग्ण आहेत त्यांच्याबाबत दोन पद्धतीने काम केलं जात आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवरील कोरोनाचा अधिकचा धोका लक्षात घेऊन त्यांना वेगळं करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नियमित न भेटणाऱ्या लोकांचाही माग काढून त्यांच्यावरही लक्ष ठेवलं जात आहे,’ असंही टोपे यांनी नमूद केलं.
तसेच, महाराष्ट्रातील प्रमुख 3 विमानतळांवर 7 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर आपलं विशेष लक्ष आहे. त्यांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्यानंतरच त्यांना आपल्या देशात फिरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोनाचा मोठा प्रभाव आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
